१६२७ ते १६८० हा सर्वसाधारणपणे शिवाजीमहाराजांचा कालखंड मानला जातो. काही अभ्यासकांच्या दृष्टीने हा काळ १६३० ते १६८० असा आहे. तरीदेखील साधारणपणे ५० वर्षे शिवाजीमहाराज हयातीमध्ये होते. ५० वर्षांच्या आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी आपल्या जीवनातून, आपल्या कार्यकर्तृत्वातून जे महत्त्वाचे पैलू तुम्हाला-आम्हाला दिले. त्यांचा विचार करण्याचा हा प्रयत्न. शिवरायांनी महाराष्ट्राला, मराठी माणसाला स्वाभिमान शिकवला. १३व्या शतकापासून परकीय आक्रमकांच्या गुलामीमध्ये जीवन जगणाऱ्या लोकांमध्ये राजांनी स्वाभिमान जागवला. अन्यायापुढे न झुकता अन्यायाविरुद्ध प्रखर लढा देण्याची शिकवन राजांनी दिली. शिवाजीराजांच्या विचारांमध्ये आणखी एक महत्त्वाचा विचार म्हणजे ध्येयवेड. ध्येयवेडे असणे काय असते, याची शिकवण हा एक महत्त्वपूर्ण पैलू आहे. रायरेश्र्वरांच्या मंदिरामध्ये वयाच्या अगदी १६व्या वर्षी स्वराज्यस्थापनेचे जे स्वप्न महाराजांनी बघिते होते, ते स्वप्न अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत महाराजांनी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केलेला होता. त्यासाठी आवश्यक असलेल्या सगळया गोष्टी महाराजांनी केल्या. त्यामध्ये सगळयात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जात, धर्म, लिंग या सगळयांच्या पलीकडे जाऊन, माणसाला केंद्रिभूत ठेवून, माणसांना एकत्र करून त्यांनी स्वराज्य निर्माण केले. हे छत्रपती शिवाजीमहाराजांच्या स्वराज्याची मूळ संकल्पना होती. हीच स्वराज्याची संकल्पना बऱ्याच अंशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या राज्यघटनेमधून आविष्कृत झालेली दिसते. लोकशाहीची व्याख्या करताना राज्यघटनेमध्ये लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही ही लोकशाहीची व्याख्या केलेली आहे. हीच शिवशाहीच्या काळामध्ये स्वराज्याची व्याख्या होती. लोकांकडून लोकांसाठी लोकांनी चालवलेले राज्य म्हणजे स्वराज्य, ही शिवरायांच्या स्वराज्याची संकल्पना होती. असे स्वराज्य आकाराला आणण्यासाठी ध्येयवेड असणे आवश्यक होते आणि असे ध्येयवेडे छत्रपती शिवाजीमहाराज होते. त्यासाठी राजांनी सर्वांना एकत्र केले. एकता ही सर्वांत मोठी ताकत असते, ही शिकवण त्यांनी दिली. त्यासाठी आपापसातील मतभेद दूर करून एकत्र येणे आवश्यक असल्याचे राजांनी समजून सांगितले. आपल्या जवळच्या लोकांमध्ये गुण राजे नेमकेपणाने हेरत असत आणि त्याप्रमाणे त्यांना कामे सापवत असत. काम सोपवताना जात-धर्म न पाहता केवळ त्याचे कौशल्य हाच निकष राजे स्वीकारीत. आपल्या जवळच्या लोकांना शिक्षा करतानादेखील राजे कचरत नसत.
शिवाजीमहाराजांनी शिकवलेली आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रजाप्रेम. सर्वसामान्य प्रजेवरसुध्दा एखादा राजा किती प्रेम करू शकतो, याचे आदर्श उदाहरण शिवाजीमहाराजांच्या जीवनामधून बघायला मिळते. राज्यातल्या छोटयात छोटया, गरिबातल्या गरीब रयतेची व्यक्तीश: काळजी घेणे, हे शिवाजीमहाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळपण होते. याचा आदर्श प्रत्येक राजकारणी व्यक्तीला राजांनी यातून दिला. युद्धनीतीमध्ये राजे तरबेज होते. गनिमी कावा, ही नवी युद्धनीती त्यांनी जगाला दिली. शत्रू प्रबळ असेल आणि आपली ताकत कमी असेल, तेव्हा या नीतीचा यशस्वी अवलंब करता येतो, हे राजांनी शिकवले. आरमार उभारले, किल्यांची डागडुजी केली, नवे किल्ले उभारले, युद्धसामग्री वाढवण्यावर भर दिला. सैन्यांना योग्य प्रशिक्षण दिले. सैन्यांना नियमित वेतनाची पद्धत सुरू केली. त्यांच्यावर पित्याप्रमाणे प्रेम केले. त्यांच्या सुख-दु:खांमध्ये राजे जातीने हजर राहायचे. त्यामुळेच जीवाला जीव देणारे मावळे राजांजवळ एकत्र झाले. त्यांच्यामध्ये राजांनी प्रखर राष्ट्रनिष्ठा जागी केली. अंधश्रद्धेला राजांनी खतपाणी दिले नाही. निरर्थक खर्चाला आळा घालण्याचा पायंडा पाडला. मौजमजा-चैनीवर राजांनी कधीच खर्च केला नाही. निर्व्यसनी आणि आचारसंपन्न राजा म्हणून राजे आजही आदर्श आहेत.
शिवाजीमहाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक आगळावेगळा विचारपैलू म्हणजे शिवाजीमहाराजांचे प्रखर भाषाप्रेम. राजांच्या काळामध्ये फारशी भाषेचा प्रयोग मोठया प्रमाणामध्ये नित्याच्या भाषेमध्ये होत होता. प्रशासकीय भाषेमध्येसुध्दा जवळपास ८५ टक्के शब्द फारशी असायचे आणि मराठी शब्द काही किरकोळ म्हणजे साधारण १५ टक्केच असायचे. म्हणून राजव्यवहारकोषाची निर्मिती करुन मराठी भाषेला वेगळा दर्जा प्राप्त करुन देण्याचे काम शिवाजीमहाराजांनी केले. या दृष्टीने आपल्याला त्याचे भाषेबद्दल काय प्रेम होते, याची कल्पना येते. राजव्यवहाराची भाषा त्यांनी स्वतंत्रपणे मराठी केलेली होती. यामुळे शिवकाळानंतर भाषेमध्ये मराठी शब्दांची संख्या लक्षणीय वाढली. ग्रंथ निर्माण करणाऱ्यांना राजांनी प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिले. सभासदाची बखर ही शिवाजीमहाराजांच्या काळातील एक महत्त्वाची बखर आहे, या बखरीच्या निर्मितीसाठी शिवाजीमहाराजांनी प्रोत्साहन दिले होते. राजांचा आणखी एक पैलू म्हणजे प्राणीप्रेम. शिवाजी महाराजांचे चरित्रामध्ये काही अद्भूत कथा आपल्याला वाचायला मिळतात. ज्यांच्यामधून शिवाजीमहाराजांचे प्राण्यांवरचे प्रेम आणि प्राण्याचे शिवाजीमहाराजांवरचे प्रेम किती अद्भूत होते, याची कल्पना येते. एक : शिवाजीमहाराजांच्या स्वराज्यातला एक कुत्रा होता, शिवाजीमहाराजांच्या चितेवर या कुत्र्याने उडी मारली. यावरून शिवाजीमहाराजांच्या मनामधले प्राणीप्रेम आणि अबोल प्राण्यांमधले राजांबद्दलचे प्रेम लक्षात येते.
SHIVAJI MAHARAJ AND RAJMATA JIJAU
आर्इवर किंवा वडिलांवर कसे प्रेम करावे, याचाही आदर्श शिवाजीमहाराजांकडून घेता येतो. शिवाजीमहाराजांचे त्यांच्या वडिलांवरही अपार प्रेम होते. शिवाजीमहाराजांचे तेव्हा वय साधारणपणे १९-२० वर्षांचे असावो. तेव्हा ते नव्याने किल्ले जिकंत होते. अदिलशहाला या गोष्टीची खबर लागली. अदिलशहाने चौकशी केली, तेव्हा सुरवातीला शिवाजीमहाराजानी सांगितले की, आम्ही तुमच्याच राज्याचा म्हणजेच अदिलशाहीचा विकास करण्यासाठी हे छोटे छोटे राज्य जिंकतोय. असे सांगून अदिलशहाला थोडे शांत करण्याचा प्रयत्न बालराजांनी केल, पण जेव्हा ही संख्या पन्नास ते साठच्या घरात गेली, तेव्हा अदिलशहाला वाटले की, हे अंगलट येण्यासारखे प्रकरण दिसतेय. त्यासाठी धडा म्हणून अदिलशहाने शिवाजीमहाराजांच्या वडिलांना म्हणजेच शहाजीराजांना कैद केले. तेव्हा जिंकलेले सगळे गड-किल्ले शिवाजीमहाराजांनी अदिलशहाला परत करून टाकले. त्या एका घटनेवरुन शिवाजीमहाराजांच्या मनामध्ये पित्याबद्दल किती प्रेम होते, किती आदर होता, ते लक्षात येते. त्याचबरोबर सर्वसामान्य मावळयांबद्दलही शिवाजीमहाराजांच्या मनामध्ये विलक्षण प्रेम होत. शिवाजीमहाराजांच्या एकूण पैलूंपैकी हाही एक महत्त्वाचा पैलू होता. शिवाजीमहाराजांनी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर त्यांनी छत्रपती व्हावे, ही शिवाजीमहाराजांच्या आर्इची, म्हणजे जिजाऊमाँसाहेबांची इच्छा होती. आपल्या मातेच्या आगराखातर शिवाजीमहाराजांनी स्वत:चा राज्याभिषेक करून घेतला होता. १८७४ साली शिवराज्यभिषेकझाला. त्याच्या अगदी सहा वर्षांमध्ये शिवाजीमहाराजांचे निर्वाण झाले. येवढया शेवटच्या टप्प्यामध्ये छत्रपतींनी स्वत:चे छत्रपतीपद स्वीकारण्याचे महत्त्वाचे कारण हेच होते. शिवाजीमहाराजांना स्वत: कधी छत्रपती व्हायचे नव्हते. कारण हे राज्य माझे नाही, तर रयतेचे आहे, असेच त्यांना वाटत होते. हे राज्य आपले आहे, हीच भावना सगळयांच्या मनामध्ये होती. परंतु आईची इच्छा पूर्ण करावी या दृष्टिकोनातून त्यांनी राज्याभिषेकाला होकार दिला.
शिवाजीमहाराजांचा धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोनही अत्यंत व्यापक होता. अफलजखानाच्या वधानंतर राजांनी त्याच्या देहाचा इस्लाम धर्माप्रमाणे अंत्यविधी करण्यास सांगितले होते. त्यांच्या अंगरंक्षकांमध्ये आणि किल्लेदारांमध्ये बरेच मुस्मिल सरदार होते. त्यांनी परधर्माचा आदर केला. वर्णव्यवस्थेला छेद देण्याचे कार्य केले. जातिव्यवस्थेला अमान्य केले. सर्व जाती-धर्मातील लोकांना आपल्या स्वराज्यामध्ये स्थान निर्माण करून दिले. शेतकऱ्यांच्या पिकाला कोणत्याही परिस्थितीत दुखापत होणार नाही, याची काळजी घेण्याची आज्ञा त्यांनी सैनिकांना दिली. वृक्षांची जपणूक करण्याचे आदेश दिले. स्त्रीचा आदर करायला शिकवले. राजांचे गुण घ्यावे, तेवढे कमी. राजांना मानाचा मुजरा.
प्रा. ज्ञानेश्वर भोसले
सहाय्यक प्राध्यापक,
मराठी विभाग,
श्री. पी. एल. श्रॉफ महाविद्यालय, चिंचणी
तालुका : डहाणू, जिल्हा : पालघर
संपर्क क्रमांक : ७७४४००९०१६