शांताबाई पवार (योद्धा आज्जी )

काही महिन्यांपूर्वी  85 व्या वर्षीय शांताबाई पवार ह्यांचे लाठी-काठीचे खेळ व्हायरल झाले,अनेक प्रसार माध्यमांनी त्यांची दखल घेतली, माध्यमांनी दखल घेतली म्हणजे साहजिकच सामान्य माणसांपासून, सामाजिक कार्यकर्ते ते सरकार  दखल घेणारंच ! मग त्या व्यक्तीला सगळया स्थरातून मदत मिळते, ज्या व्यक्तीवर प्रसिद्धीचा झोत असतो, त्या व्यक्तिसोबत हल्ली फोटो सुद्धा काढले जातात. ही प्रसिद्धीची लाट संपली की सगळं जैसे थे.. ही लाट ज्या वेगात उसळते त्याचं वेगात  ओसरतेही .. शांताबाई पवार सुद्धा ह्याला अपवाद कशा असणार ? त्यांना आर्थिक मदत देण्याचे  वारे वाहू लागले आणि रोज त्यांच्यावर कधी पेपर मध्ये कधी टीव्हीवर  अमुक मंत्र्याने, अभिनेत्रीने, अभिनेत्याने  केली शांताबाईना अमुक अमुक रक्कमेची मदत केली अशा बातम्यांचा मारा होऊ लागला आणि माझे कुतूहल वाढले.अशात शांताबाई ह्यांच्यावर  FTII च्या टिव्ही विंग (2018-2019) विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमातील  प्रोजेक्ट म्हणून बनवलेला 11 मिनिटांचा माहितीपट मी पाहिला.मनात अस्वस्थता निर्माण झाली त्याच बरोबर 85 व्या वर्षाच्या ‘योद्धा’ आज्जीच्या व्यक्तीमत्वाने मी प्रभावित झाले.

इंद्रायणीच्या खळखळणाऱ्या पाण्याच्या आवाजाने माहितीपटाची सुरवात होते, ज्ञानोबा-तुकारामचा जयघोष,  मंदिरातली आरती ऐकू येते आणि हळू हळू जत्रेचे स्वरूप असलेली गर्दी, त्या गर्दीतले वेगवेगळे आवाज आणि त्याच गर्दीत खेळण्याच्या  उघड्या दुकानात  निवांत बसलेल्या शांता  आज्जी आपल्या आयुष्याची थोडक्यात  गोष्ट सांगू लागतात. डोंबारी समाजाची उत्पत्ती कशी झाली? त्याच्याशी जोडली गेलेली आख्यायिका ते डोंबारी समाज कशा प्रकारे कष्ट करून भाकरी मिळवतो ह्यावर त्या  प्रकाश टाकतात आणि मग स्वत:च्या आयुष्याच्या कथे कडे  वळतात पुढच्या अनेक फ्रेम्स मधून त्यांचे खेळ दाखवले आहेत.

हे पहाताना लोक कवी जगदीश खेबुडकर ह्यांनी लिहिलेल्या ओळींची आठवण आल्या शिवाय राहत नाहीत.

ढमाढम ढोल रं झमाझम झांझरी,

नचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी

उद्याच्या पोटाची काळजी कशाला

आभाळ पांघरु दगड उशाला

गाळूनी घाम असा मागूया भाकरी

नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी …..

शांताबाई आज्जींचं आयुष्य पण असंच आहे..

भारतात मुलगी म्हणजे काचेचं भांडं.. ते पुरुषासोबतचं जास्तं सुरक्षित राहू शकतं, असं समजलं जातं म्हणून अनेक वेळा मुलगी वयात आली रे आली किंवा 18 वर्ष पूर्ण झाले की लगेच तिचं लग्न लावलं जातं, हेच शांताबाईंच्या बाबतीतही झालं..  त्यांचं लवकर लग्न त्यांच्या वयाच्या दुप्पट वय असलेल्या माणसाशी लावलं गेलं.. अर्थात त्याकाळातील परिस्थितीची दाहकता त्याच काळाचा चश्मा लावून पहावी म्हणजे शांताबाईंनी काय भोगलं असेल याची कल्पना येईल..त्यांनी आहे ती परिस्थिती स्वीकारली, त्यांच्या पतीचे अकाली निधन झाले आणि त्या डोंबारी  खेळ करून स्वत:ची आणि परिवाराच्या पोटाची खळगी भरू लागल्या.कधी कधी माणूस विविध प्रकारच्या प्रलोभनांना बळी पडतो आणि रस्ता भरकटू शकतो.ह्या सगळ्या प्रवृत्तींना  उतार वयात ही कष्टाचीच भाकरी खाणाऱ्या  शांता आज्जी एक सणसणीत चपराक आहेत असं मला वाटतं ..बाईमाणूस  आणि त्यातून ती एकटी असेल तर अनेक वसवसलेल्या नजरा  तिच्यावर खिळून असतात, अनेक नकोसे स्पर्श होतात आणि असंख्य प्रकारचे आमिष तिला दाखवले जाते, असे अनेक प्रसंग त्यांच्याही आयुष्यात आले पण त्यांनी  कोणाला जुमानले नाही सगळ्यांना खमकेपणे उत्तर दिले.

अनेक  गाजलेल्या चित्रपटांमध्ये (सीता-गीता, त्रिदेव,शेरणी इत्यादी) त्यांनी अनेक सुप्रसिद्ध अभिनेत्रींसाठी(हेमा मालिनी, श्रीदेवी) बॉडी डबल केले (बॉडी डबल म्हणजे  जी व्यक्ती जे पात्र साकारत असते त्या व्यक्ती ऐवजी इतर व्यक्तीचा शॉट घेणे आणि असं भासवणे की तो सिन त्या मुख्य नायक किंवा नायिकेनेच साकारलेला आहे.)माहितीपट पहाताना त्यांच्या पायावर गोंदलेली फुलं  तुमचं लक्ष वेधून घेतात ना घेतात, तोच त्यांच्या पायांना पडलेल्या भेगांकडे लक्ष जातं.85 व्या वर्षी सुद्धा त्यांचा आवाज मृदु आहे आणि चेहऱ्यावर लहान मुलासारखं निरागस हसू आहे. ह्या वयात ही त्यांची कोणी किव करावी, कोणी त्यांना सहानभूती द्यावी असं त्यांना वाटत नाही. जो पर्यंत श्वासात श्वास आहे तो पर्यंत मी काम करत राहणार, असं त्या सांगतात,मृत्यू आला तरी तो काम करताना शांतपणे यावा असं त्यांना वाटतं.त्यांच्या नातींची त्यांना वाटणारी काळजी देखील त्यांच्या शब्दातून झळकते..

आजवर लोककलांचे डॉक्युमेंटेशन झालेले  दिसत नाही , डोंबारी खेळ ही कला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, अनेकांनी हा पिढीजात व्यवसाय सोडून अनेक वेगवेगळे मार्ग निवडले आहेत. शांता आज्जींची पुढची पिढी देखील हा व्यवसाय करणार नाही. ह्या माहितीपटाच्या निमित्ताने काही खेळांचे सुद्धा संकलन झाले.. ह्या महितीपटाचे दिग्दर्शन,त्यात वापरले गेलेले पार्श्वसंगीत ह्यामुळे हा माहितीपट खूप संवेदनशील न होता वास्तव समोर बघत आहोत ह्याचं भान राहतं.फक्त शांता आज्जीच नाही तर डोंबारी समाज सुद्धा  या माहितीपटाने वेगळ्या उंची वर नेला आहे हे निश्चित..पण तरीही असंख्य प्रश्न डोळ्यांसमोर उभे राहतात.मी आणखी रिसर्च  केला.. मग कळलं शांताबाई ह्यांची 17 नातवंडं  आहेत.. त्यातल्या 14 नातवंडांचा त्या सांभाळ करतात त्यापैकी 7 नाती आहेत ज्या शांता आज्जींवर  अवलंबून आहेत  त्यांचं आणि एकूणच डोंबारी समाजाचं पुढे भवितव्य काय? हा प्रश्न मात्र मनाला टोचणी लावून रहातो..

हा समाज भटक्या विमुक्त जातीतला..अनेक कुप्रथा इथे आहेत. जसं 1 वर्षाच्या मुलाला अंग लवचिक व्हावे म्हणून गावठी दारू पाजली जाते,बाई वर नजर पडू नये म्हणून त्यांना अंघोळ करणे निषिद्ध आहे, स्वयंपाक करणे ही निषिद्ध आहे. आणि अशा अंगावर काटा आणणाऱ्या बऱ्याच गोष्टी..अनेक जीवघेणे  खेळ हे  शारिरिक अपंगत्व आणतात त्यामुळे सरकारने त्यावर बंदी आणलीय..सरकारच्या अनेक योजनांमुळे अनेकांचे राहणीमान सुधारले आहे. सुधारणा होत राहील पण जिथे ही सुधारणांची सूर्यकिरणंच पोहचत नाहीयेत अशा लोकांनी कितीकाळ अंधाराचे शाप भोगावेत? दारिद्रयरेषेतला वर्ग  पुढे कमीत कमी मध्यम वर्गीय  होऊ शकेल का?ही गरीबी अशीच राहिली तर? मनाला पोळणारा असाच एक प्रश्न.. गरिबी म्हटलं की त्या सोबत अनेक प्रश्न जन्म घेतात व्यसनाधीनता असेल, गुन्हेगारी असेल आणि अशा अनेक प्रश्नांच्या वर्तुळात बाईचं आयुष्य डांबलं जातं.. त्या वर्तुळातून बाहेर येण्यासाठी चाचपडत रहातं.. तिची सुरक्षा ऐरणीवर येते.. त्या ऐरणीसारखीच ती वरुन तापलेलं लोखंड आणि त्यावरही घणाचे घाव झेलत रहाते.. कधी जात्यातल्या दाण्यां सारखीच ती भरडत जाते.. मागे उरते फक्त असंख्य प्रश्नांची त्या जात्यातली घरघर.. कधी न संपणारी घरघर..

श्रध्दा जगदाळे

Related Posts