संगीत ही भावनांची जागतिक भाषा आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात संगीत बनवलेलं असो ते प्रत्येक माणसाच्या मनाला कळतं.. एकटेपणाच्या पोकळीत संगीत साथ देतं.. कधी माणसांच्या घोळक्यात संगीत झिंग चढवतं.
कासव मधल्या लहर समंदर रे, मुळशी पॅटर्नमधलं पाणी पाणी आणि न्यूड मधलं दिस येती दिस जाती, ह्या गाण्यांचा आवाज एक तंद्री लावतो. तो आवाज आहे सायली खरे ह्या अभिनेत्री, गायिका ,संगीत दिग्दर्शिका हिचा.. तिची आर्टिस्टिक जर्नी समजून घेण्याचा संवादातून केलेला हा छोटासा प्रयत्न.सायलीला संगीतासाठी म.टा आणि झी गौरव आदी पुरस्कार मिळलेले आहेत.
दुसरीत असल्या पासून सायलीला कविता लिहिण्याची आवड निर्माण झाली.. दासबोधाची शैली तिला आवडली, त्याचाही प्रभाव सायलीच्या लेखनात दिसून येतो.सायलीचे बाबा हे सुरेश भटांना तिच्या कविता दाखवत असत.. तिला शांता शेळके यांच्या रूपाने एक मैत्रीण मिळाली.. सुरेश भट आणि शांता शेळके ह्यांच्याकडून लहानपणी मार्गदर्शन मिळाले.. ह्याच बरोबर शाळेत असताना सायली तबला ,हार्मोनियम, भरतनाट्यम शिकत गेली.
पुढे पदवी, भरतनाट्यमचे शिक्षण पूर्ण केल्यावर सायलीला अभिनयाची आवड असल्यामुळे सायलीने एफ.टी.आय. आय. ला प्रवेश घेतला. त्याच बरोबर स्वत: गाणी रचून त्यांना चाली लावणं सायलीला खूप आवडायचं .
एफ.टी.आय. आय. मधून अभिनयाचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर सायलीने अभिनय क्षेत्रात करियर करण्याची इच्छा बाबां जवळ व्यक्त केली.. त्यावेळेस तिच्या बाबांनी तिला तू नक्कीच अभिनेत्री बन असा विश्वास दिला, पण ह्या क्षेत्रातल्या अस्थिरतेच्या वास्तवाची जाणीवही करून दिली.

सायलीला वेगवेगळ्या देशात जाण्याची इच्छा होती. पण बाबांनी तिला सांगितलं एक कलाकार म्हणून तू आधी स्वत:चं भवताल बघ.. तू आधी कोंकण बघ.. विदर्भ, मालवण बघ, स्वत: जा एकटी जा, शिकण्यासाठी जा, त्या शिवाय तुझा दृष्टिकोन तयार होणार नाही.. काही वाटलंच तर आम्ही तुझ्यापाठीशी आहोत.. ह्या मुळे सायली तिचा गिटार घेऊन कुठे ही बिंधास्त जायची.. अगदी लडाख पासून तोरडमल पर्यंत सायलीचा प्रवास बराच झाला.. त्याच बरोबर ज्या भागात ती जायची तिथली भाषा, लोकसंगीत हे देखील तिच्यात मिसळू लागले.. अरदास ,गुरबानी,अभंग ,संतवाणी हे विविध राज्यातलं लोकसंगीत सायलीला आवडतं.

एकटा प्रवास केल्याने आपण स्वत:शी जोडले जातो, आपल्या आतला आवाज आपल्याला ऐकू येतो , जो ह्या शहरातल्या गोंगाटात हरवून गेलेला असतो. त्याच बरोबर, दुसरीकडे प्राॅडक्शन कंट्रोलर ते लेखन हे छोटे छोटे प्रोजेक्ट्स ती करत होती.. अशातच सायलीला कासव, मुळशी पॅटर्न ह्या चित्रपटां मध्ये गाण्याची संधी मिळाली.. न्यूड चित्रपटात दिस येती, दिस जाती ह्या गाण्याचे गीत लेखन आणि संगीत दिग्दर्शन सायलीने केले आहे.. त्यासाठी तिला झी गौरव, म.टा पुरस्कार मिळाले आहेत.
खारी बिस्कीट, अप्पा आणि बाप्पा, कुलकर्णी चौकातला देशपांडे, बॉम्बे रोझ ह्या आगामी चित्रपटांमध्ये सायलीने दिग्दर्शित केलेली, गायलेली गाणी आपल्याला ऐकायला मिळणार आहेत.
-श्रध्दा जगदाळे..