माई (संगीता साळुंखे )

एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये आधुनिक युगाचे आयाम पडताळताना खूप मोठी मजल आपण पार केलीय असं वाटतं.. मात्र हेच निकष जेव्हां स्त्रीच्या आयुष्याला आपण लावतो तेव्हां बहुतांशी स्त्रियांचे जीवन अजूनही पुराणकाळाच्या उंबरठ्यातच अडकलेय असं जाणवतं.. ग्रामीण भागातील “ती” अजूनही परंपरांच्या जोखडाखालीच लटकलेली आहे.. अशा स्त्रियांसाठी काम करताना एकीकडे परंपरांची बांधीलकी जपूनही आत्मविकास साधता येतो याची प्रचिती देणाऱ्या सातारा जिल्ह्यातील किवळ येथील माई चॅरीटेबल ट्रस्टच्या, संगीता साळूंखे, माई यांचेशी मनमोकळ्या गप्पा.

माई.. या उपाधीनेच आज आपण ओळखल्या जाता.. ही ओळख कशा पद्धतीने रुजवलीय आपण?
ही ओळख रुजवण्यासाठी फार काही केलेय मी असं नाहीय.. बरेचदा तुमचं काम तुमची ओळख निर्माण करतं.. माझ्या कुटुंबा मध्ये मी माई आहे.. पण समाजामध्ये माई म्हणून उभं रहाणं ही एक जबाबदारी होती..

ती जबाबदारी मी माझ्या परीने निभावतेय इतकंच.. आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात कशी झाली?
माई : खरं तर प्रत्येक जण आपल्या परीने आपल्या आयुष्यात सामाजिक बांधीलकी म्हणून काही ना काही करत असतोच.. माझा जन्म शिरगावांतील राजकिय वातावरण असलेल्या कुटुंबामध्ये झाला.. माझ्या आईचे वडील स्वातंत्र्यसैनीक.. माझे मामाही कराड मधले मोठे राजकिय प्रस्थ.. माझे वडील हणमंतराव मोहिते हे वेगवेगळ्या सामाजिक चळवळी रुजवत होते.. अगदी कितीतरी शाळां मध्ये नियमीत जाऊन मोफत इंग्रजी शिकवत होते… या साऱ्या संस्कारांमध्ये मी वाढले.. माझा बालपणीचा काळ जरी सुखाचा तरीही बऱ्याच घटनांचे परिणाम विपरीतही झाले आहेत.. मग त्यामध्ये माझ्या वडिलांचा अकाली मृत्यू… अशा काळात मला शिक्षणाशिवाय इतर काही विचार करणं शक्यही नव्हतं.. त्यामुळे माझ्या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली ती लग्ना नंतर.. आणि आज माझे पती तानाजीराव साळूंखे, माझ्या जाऊबाई, दीर, मुले, पुतणे या सर्वांच्या पाठबळावर मी पुढे सरसावते आहे.. माई चॅरीटेबल ट्रस्टचे एक छानसं नेटवर्क आज सातारा जिल्ह्यामध्ये उभं रहातं आहे.

ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी संघर्ष करत असताना नेमक्या कोणत्या प्रश्नांसाठी जास्त फोकस करावं वाटतं?
संघर्ष वगैरे खूप मोठा शब्द होईल.. संघर्षापेक्षा संवादावर माझा जास्त विश्वास आहे.. कारण हा संवादच माझं बरंचसं काम सोपं करुन जातो… तसंही आम्ही खूप प्राथमिक स्तरावर काम करतो आहोत.. कारण स्त्रियांचे बहूतांशी प्रश्न अजूनही प्राथमिक स्तरावरच आहेत.. फार मागण्या नसतात त्यांच्या.. जे हवं असतं त्यांना ते साध्य करणं खूप सोपंही असतं.. पण ते त्यांच्याकडून होत नाही.. कारण समाज तशी परवानगी देत नाही.. म्हणजे आता उदाहरण म्हणून सांगते, एखादा लग्न समारंभ सुरु आहे, सुवासिनींची तिथं वर्दळ आहे.. त्या मंगल कार्यालया मध्ये त्या नववधू वरांसाठी अनेक भेटवस्तू मांडलेल्या असतात.. रुखवत असतो.. भांडीकुंडी, बेडही असतो.. कल्पना करा कि या लग्नासाठी आलेली एखादी विधवा त्या भेटवस्तूं मधली एखादी वस्तू उचलून हातात घेते, भांडी पहाते तर लगेच कपाळाला आठ्या पडाव्यात आपल्या? ती स्त्री जर दमलीभागली असेल आणि त्या बेडवर बसली तर? आकांडतांडव सुरु होतं.. अगदी सहज कृती असते.. पण सुवासिनीच्या बेडवर विधवेनं बसावं? आता कुठं त्यांच्या वैवाहिक आयुष्याचा शुभारंभ होतोय तोवर हिनं अपशकून करावा? केवढा मोठा गहजब होतो.. हा प्रसंग मी एका लग्नामध्ये स्वत: पाहिलाय.. असे अनेक प्रसंग… म्हणूनच या अशा मुलभूत प्रश्नांना वाचा फोडणं आणि त्यातले फोलपण निदर्शनास आणून देणं ही गोष्ट मला जास्त महत्वाची वाटते..

संघर्षापेक्षा संवाद असं आपण म्हटलात.. आणि अतिशय प्राथमिक स्तरावरचे प्रश्न यामुळं कुठे आपल्या कार्यास मर्यादा आलेयत असं जाणवतं का?
माई : मर्यादा म्हणाल तर त्या मी स्वत:हूनच स्विकारल्या आहेत.. संघर्ष करुन फार मोठं काही उभं करायचाय हे माझं ध्येय नाहीच आहे.. प्राथमिक स्तरावरच आणि त्याच मर्यादेत आधी काम करणं जास्त गरजेचं कारण ही तुमची पायाभरणी असते.. ती मजबूत व्हायला हवी.. स्त्रीच्या आयुष्याचा पहिला स्तर सुरु होतो तो कुटुंबापासून.. इथं संघर्ष तर अजिबात नकोय.. संवादच हवा.. माझ्या मते एखादी स्त्री समाजामध्ये खूप मोठ्या स्थानावर आहे आणि जर ती स्वत:चं कुटुंब सांभाळू शकत नसेल म्हणजेच तिच्या कुटुंबातील काही संघर्ष ती स्वत:च उभा करत असेल तर मग नक्कीच कुठेतरी काहीतरी चुकतेय.. प्राथमिक स्तरावर आधी मजबूत व्हा.. मग पुढे पाऊल टाका.. नक्की पुढे पाऊल टाका.. चौकटीतच रहा असं नाही.. पण आधी चौकट भक्कम हवी..

आपल्या कुटुंबातून हीच आदर्श ओळख आपण किवळ गावामध्ये निर्माण केलीय.. त्याबद्दल थोडंसं..
माई : माझं कुटुंब हे गेल्या तीन पिढ्या एकत्रीत असणारं कुटुंब आहे.. खरं म्हणजे लग्ना आधीच माझा अट्टाहास होता कि एकत्रीत कुटुंबामध्येच लग्न करेन.. या जगावेगळ्या अपेक्षा ऐकून माझ्याच घरचे लोक हसायचे कि हिच्या म्हणण्याप्रमाणे कुटुंब आजच्या काळात कुठे मिळणार?.. पण मला ते लाभलं.. आणि जे लाभलं ते टिकवणं आता माझी जबाबदारी आहे.. त्यासाठी काही गोष्टी मी प्रकर्षाने पाळते.. पहिली गोष्ट म्हणजे गॉसिपींग टाळणं.. नात्यानात्यांमध्ये या एकाच गोष्टीमुळं भिंती घातल्या जातात असं मला वाटतं.. एखाद्या व्यक्तीविषयी तुमच्या मनात राग असेल, चीड असेल, द्वेष मत्सरही असेल तर तुम्ही ते स्पष्टपणे त्या व्यक्तीच्या तोंडावरच बोललं पाहिजे.. तेवढा तुमचा त्या व्यक्तीवर अधिकार असतोच.. तुमच्याकडून एखाद्या व्यक्तीच्या मागे कुजकट बोललं जात असेल तर ती तुमच्या मनातली विकृती आहे.. तुमच्याजवळही असं कुणी बोलत असेल तर त्या व्यक्तीलाही तुम्ही तत्क्षणी थोपवले पाहिजे.. सामान्यत: आपल्याला असे विषय चघळणं आवडतं.. बरेचदा त्यात काही तथ्य सत्यही नसतं.. मात्र आपली विकृत तहान शांत करण्यासाठी आपण बोलत रहातो… या विकृतीतून कुटुंब उद्धवस्त होऊ शकते हे आपण लक्षात घ्यायला हवं.. दुसरी गोष्ट म्हणजे कुटुंबातील सदस्यांमध्ये दुजाभाव नसावा.. म्हणजे समजा एक मुलगा महिना हजारो लाखो रुपये कमावतोय आणि दुसरा शेतीमध्ये आपल्या आयुष्याची माती करुन घेतोय तर या दोन मुलां मध्ये सख्खी आई सुद्धा भेदभाव करते.. एकाला गरम जेवण दिलं जातं तर दुसऱ्याच्या ताटात शिळं पाकं असू शकतं.. हे टाळायला हवं.. माणूस म्हणून दोघेही एका स्तरावर आहेत.. तीच त्यांची ओळख जपली गेली पाहिजे.. त्यांच्या नावाला चिकटलेल्या ज्या काही डिग्री असतील त्या घराबाहेर.. चार भिंतीच्या आत सारे सारखेच.. इथं मी माझ्या मुलाला आणि माझ्या पुतण्याला दुधाचे ग्लास देत असेन तर दोन्ही ग्लास तेवढेच भरलेले असावेत.. एखादा घोट दूध जास्त प्यायला म्हणजे माझा मुलगा मोठा होणार नाहीय किंवा एखादा घोट कमी पडला म्हणजे पुतण्या अशक्त रहाणार नाहीय… त्या दोन्ही मुलांचा माझ्याकडे पहाण्याचा दृष्टीकोण मात्र बदलेल.. मुलाला वाटेल आई मुभा देतेय.. मीच श्रेष्ठ आहे.. मग मी कसेही वागले तरी इथे चालेल… पुतण्याला वाटेल कि ही बाई दुष्ट आहे.. आपल्याला डावलतेय..थोडक्यात काय तर माझ्याच हाताने मी माझ्या मुलासाठी घरातच शत्रू निर्माण करु नयेत ही माझी जबाबदारी आहे..

आपल्या कुटुंबात असे एकूण किती सदस्य आहेत?
माई :साधारण तीस लोक.. आता आपल्याला असं वाटेल कि एवढे लोक एकत्रीत बांधणं म्हणजे प्रत्येकाच्या काही ना काही कुचंबणा असतीलच.. अशा मोठ्या कुटुंबामध्ये स्त्रियांचं काम म्हणजे फक्त रांधा वाढा उष्टी काढा इतकंच असू शकतं.. पण माझं कुटुंब अपवाद आहे.. इथं प्रत्येकाचं मत मोलाचं आहे आणि ते मत परखडपणे मांडण्याची मोकळीकही आहे.. ही कामं स्त्रियांची ही कामं पुरुषांची असा भेदभाव आपण ठेवू नये.. कारण कुटुंब म्हटलं कि तिथे तुझं किंवा माझं नसतं.. जे असतं ते आपलं.. माझ्या मुली जशा उच्चशिक्षीत आहेत तशा माझ्या सुनाही.. आणि इथं प्रत्येकाला त्याचं त्याचं आभाळ मोकळं आहे..

कुटुंबापासून असे आदर्श उभे करुन समाज नावाच्या अंगणात पाऊल टाकताना माई चॅरीटेबल ट्रस्टच्या उभारणीचे अनुभव काय होते?
माई :आधीच संघर्षापेक्षा संवाद हे तत्व अवलंबल्यामुळे ही वाटचालच वेगळी होती.. माझ्या माहेरी सुद्धा मी भरभक्कम एकत्रीत कुटुंबाचा अंश होते.. माझ्या आईचे माहेर आणि सासर एकाच घरी नांदत होते.. माझे मामा आणि माझे वडील एकत्रीतच वाढले.. हे सारं संस्कार रुपाने रुजले होतेच.. मी लग्न होऊन ज्या किवळ गावी आले त्या गावाविषयी आधी सांगते.. दख्खनचा राजा जोतिबाचे परमभक्त संत नावजीबुवा याच किवळ गावचे.. ज्यांच्या मुळे जोतिबाचे चैत्र यात्रेस किवळची मानाची सासनकाठी जाते.. या नावजीबुवांची ख्याती अशी कि अगदी दोन तीन शतकां पूर्वी त्यांनी आपल्या सुनेला सुशिक्षीत बनवले होते आणि सामाजिक कार्यात मोकळीकही दिली होती.. नावजीबुवांनी किवळ वासियांसाठी बांधलेली भव्य विहीर आजही सुस्थितीत आहे.. जोतिबा आणि नावजींचा हा संदर्भ मी एवढ्यासाठीच देतेय कि या नावजीबुवांचं त्या काळातील सामाजिक कार्य हे माझी प्रेरणा ठरलं आणि मी माझ्या कामाची सुरुवात केली… एखादा संत जर असे सामाजिक क्रांतीची पताका खांद्यावर घेत असेल तर त्याचा वारसा मिरवणाऱ्यांनी फक्त त्यांचे नामस्मरण भजन संकीर्तनच करावे का? मी हाच सवाल किवळ वासियांपुढे ठेवला आणि नावजीबुवांच्या मंदीर बांधणीच्या निमित्ताने गावच्या महिलांना एकत्रीत करुन माई चॅरीटेबल ट्रस्टची पायाभरणी केली.. खरं तर या आधी माझे काम मुंबईत सुरु होतेच.. माझे पती तानाजीराव साळूंखे यांच्या शासकिय सेवेमुळे मी अगदी माझ्या लग्नापासूनच किवळपासून सतत दूर राहिले.. मात्र मला पुणे मुंबईपेक्षा माझ्या गावातच या कामाची मुहूर्तमेढ रोवायची होती.. याचं कारण म्हणजे गावाकडचा भाग मागास आहे आणि मला तो सुधारायचा आहे असं काही नव्हतं.. पण मला जाणवलं कि शहरातल्या मुलांना, स्त्रियांना सुविधा भरपूर मिळतात.. गावाकडे सुविधांची वाणवा असूनही इथली मुले शहराच्या तुलनेत अव्वल आहेत.. मग या मुलांसाठी मी सुविधा निर्माण करु शकले तर काय होईल? इथल्या स्त्रिया शहराच्या मानाने अधिक प्रतिकारक्षम आहेत.. मग ही सुबत्ता असूनही त्यांनी मागे का रहावं? हाच विचार करुन माई चॅरीटेबल ट्रस्टचे काम गावाकडून शहरात न नेता उलट शहरातून गावाकडे आणलं..

सध्या या कामाचे नेमके स्वरुप काय आहे?
माई : मुंबईत झोपडपट्टीतल्या मुलींचे शैक्षणिक समुपदेशन मी करत होते… झालेच तर त्यांचेसाठी मोफत योगवर्ग.. गावाकडे आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून काम करताना मी अशाच शैक्षणिक सुधारणांवर भर दिला.. बऱ्याच शाळांसाठी जेवढी मदत उभारता येईल तेवढी उभारुन त्यांचा दर्जा सुधारला.. मुलांना क्रिडा प्रोत्साहन देणं, त्यांच्या उपजत गुणांना संधी उपलब्ध करुन देणं हे ही सुरु आहेच.. गावातील स्त्रियांसाठी कृषीशिक्षण उपक्रम, त्यासाठी कृषी सहली, दरवर्षी आठ मार्चला महिला दिनाचे निमित्त साधून गावातील विधवांकरवी ध्वजारोहन असे खूप उपक्रम उभे केलेयत आणि त्याचे परिणामही अगदी दूरगामी आहेत.. नावजीबुवांनी जसे या गावासाठी जलसंधारण कार्य केले होते तोच वसा वारसा जपताना आम्ही किवळमध्ये जलयुक्त शिवार आणले आणि अगदी दुष्काळाच्या कुशीत असणारे किवळ आज नंदनवन बनलेय.. अगदी महाराष्ट्रभरातून लोक इथला पाणीप्रकल्प पहायला येतात हे आम्हा किवळ वासियांना नेहमीच अभिमानास्पद..

मुलाखत : युवराज पाटील .

Related Posts