महाराष्ट्रातील त्या पहिल्या महिला आर्किटेक्चर कन्सल्टंट , महसूल आणि जमिनीशी निगडित कामाच्या सल्ल्यागार आहेत. विशेष म्हणजे साधारण 30 वर्षांपूर्वी असं कोणतंच करियर अस्तित्वात नव्हतं. त्या स्वत: इंटिरियर डिझाईनर असल्यामुळे आर्किटेक्ट,कॉन्ट्रॅक्टर ह्यांना काय अडथळे येतात ह्याचा त्यांना अंदाज आला होता, म्हणून त्यांनी हे करियर निर्माण केलं. ह्या क्षेत्रात काम करणारे जवळपास सगळेच पुरुष, स्त्रिया तशा कमीच. अशा क्षेत्रात पुरुषाच्या बरोबरीने काम करणं ही गोष्ट तशी आव्हानात्मक होती. अजूनही अनेक साईट्सचं मुख्य काम बघणारा एखादा पुरुषच असतो.

आज ह्या क्षेत्राकडे करियर म्हणून बघितलं जातं. बरेच जण फुलफ्लेजड् ह्या क्षेत्रात काम करत आहेत. समाजसेवेसोबत अर्थकारण ह्या उद्देशाने त्यांनी हे क्षेत्र निवडलं. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग आहे. त्याचबरोबर त्यांचे स्वत:चे एनजिओसुद्धा आहेत. गरज असेल तेवढेच कमवा आणि गरजेपेक्षा जास्त असेल तर आपल्यातली अर्धी भाकरी ही इतरांसोबत वाटून खा, हे जॉय ह्यांचं तत्त्व आहे.
जॉय कलामंच ह्या त्यांच्या प्राॅड्क्शन हाऊसअंतर्गत उत्तमोत्तम कलाकृतींची निर्मिती मराठी आणि गुजराती भाषेत केली जाते.‘पाऊले चालती पंढरीची वाट’ ह्या त्यांच्या नाटकाला महाराष्ट्र शासनाचे अनुदान प्राप्त आहे. गतवर्षी जागतिक थिएटर ऑलिंपिकमध्ये या नाटकाचे सादरीकरण झाले असून अनेक मराठी समीक्षकांनी हे नाटक गौरविले आहे. क्वीनमेकर, कळत नकळत अशी काही उल्लेखनीय नाटकं आहेत, ज्यांचे साधारण 100 पेक्षाअधिक प्रयोग झाले आहेत. त्याचबरोबर गुजरातीमध्येही जॉय कलामंच निर्मित अनेक नाटकं सादर केली जातात.

त्याचबरोबर गाण्यांच्या मैफिलींचं आयोजनही जॉय कलामंचअंतर्गत केले जाते आणि असे अनेक कार्यक्रम हाऊसफुल ठरले आहेत. लोकप्रिय झाले आहेत. असं म्हणतात की, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री खंबीरपणे उभी असते, तसेच प्रत्येक यशस्वी स्त्रीसोबत एक पुरुष उभा असतो. एकमेकांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करून आपआपली करियर करणं ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे जॉय-नागेश. ह्यालाच कदाचित प्रेमात साथ देणं असं म्हणतात.
— श्रद्धा जगदाळे