विष्णू मनोहर- जागतिक कीर्तीचे भारतीय बल्लवाचार्य अर्थात शेफ.
असं म्हणतात हृदय जिंकण्याचा मार्ग हा पोटातून जातो ,अशीच अनेकांची हृदय शेफ विष्णू मनोहर ह्यांनी वेगवेगळ्या कूकरी शो द्वारे जिंकलेली आहेत
‘विष्णूजी की रसोई’ ही उपगृहांची शृंखला ते Manover (मनोवर) हॉस्पिटॅलिटीचे कार्यकारी शेफ हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. अविरत ५३ तास स्वयंपाक करून विश्वविक्रम प्रस्थापित करणाऱ्या विष्णू मनोहर यांनी पाककलेसंबंधी पन्नासहून अधिक पुस्तकांचे लिखाण त्यांनी केले आहे. देशविदेशात पाककलेविषयी ४५०० हून अधिक कार्यक्रम त्यांनी केले आहेत.
मेजवानी परिपूर्ण किचन ह्या कार्यक्रमा द्वारे तब्बल 14 वर्षे त्यांनी कित्येक घरात उत्तम सुग्रणी घडवल्या .लहानपणी मी देखील सरांचा कूकरी शो पाहून अनेक पाककृती शिकले .विष्णु मनोहर हे उत्तम शेफ आहेत . त्याच बरोबर एक संवेदनशील कवि,चित्रकार आणि उद्योजक आहेत.आज शिवकालीन खाद्यसंस्कृती आणि त्यांचा प्रवास मुलाखती द्वारे उलगडताना मला खूप आनंद होत आहे
- पूर्वी करियरसाठी ‘शेफ‘ या तसा आडवळणी पर्याय होता. तुम्ही ह्या क्षेत्राकडे कसे वळलात ?
- शेफ म्हणून करियर करायचं असं काहीच डोक्यात नव्हतं. तो सगळा अनिच्छित प्रवास आहे. खरंतर अभिनयच्या क्षेत्रात करियर करायची माझी इच्छा होती. बाबा चित्रकार होते. त्यामुळे आपसूकच माझा चित्रकारीतेकडे ओढा होता. बाबा काम करत असताना मी त्यांना मदत करायचो. समारंभासाठी अक्षरांचे पेंटिंग करायची कामं बाबांकडे यायची. मग कधीकधी बाबांनी तयार केलेली अक्षरं कापून ती पडद्यावर बसवण्याच्या कामात त्यांना मदत करण्यासाठी मी त्यांच्यासोबत समारंभात जायचो. तिथे एका कॅटर्सची ओळख झाली. त्यांच्याकडे डेकोरेटरचे काम करू लागलो. मग हळूहळू कॅटरिंगचे काम आवड निर्माण झाली. काम करताना मला मजा येऊ लागली. चार पैसे मिळू लागले. आपण आपल्या परिवाराला आर्थिक अडचणीतून बाहेर काढत आहोत याचं समाधान मला मिळू लागलं. पुढे जाऊन केटरिंग चा व्यवसाय करता करता विविध पाककृती शिकायला लागलो . पण अभिनयाची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. शेवटी पैसा किंवा स्वतःची आवड याच्यात तडजोड करणं मला भाग होतं. तुमचा पोटापाण्याचा प्रश्न जिथे मार्गी लागतो त्या कामात तुमचा कल जास्त वाढत जातो. अंततः मला माझ्या अभिनयाच्या आवडीवर पांघरून घालावं लागलं. पण तुम्हाला सांगितलं तर नवल वाटेल की माझं पाककलेच्या करियरसाठी मी कुठे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलं नाही. म्हणजे हॉटेल मॅनेजमेन्ट वैगरे असं माझं काहीच झालेलं नाहीय.
अभिनेते शेफ विष्णू मनोहर
- कुठलेही शास्त्रशुद्ध शिक्षण न घेता तुम्ही एक उत्तम बल्लवाचार्य / शेफ म्हणून स्वतःची ख्याती निर्माण केली. त्यामागे नेमकी प्रेरणा काय?
- माझी प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आणि माझे आईबाबा.
माझ्या लहानपणी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी, त्यांच्या पराक्रमांनी मी खुप प्रभावित झालो होतो. त्यांचा जिद्दीने मी भारावून गेलो. आजही ते माझे प्रेरणास्थान आहे. नेहमी वाटायचं की महाराजांनी अगदी लहान वयात सुद्धा स्वराजाच्या ध्यासाने किती काही गोष्टी केल्या. आपल्याकडे सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध असताना आपण का काही करू नये असा विचार सतत मनात यायचा. पण नेमकं काय करायचं, कसं करायचा हे माहित नव्हतं. घरची परिस्थिती बेताची. बाबा चित्रकार आणि आई किराणा घराण्यातील गायिका. पण पालक म्हणून ते त्यांची भूमिका एकदम उत्तम पाडत होते. आम्हाला कसल्याच गोष्टींची कमी भासणार नाही ह्यासाठी त्यांचा पुरेपूर प्रयत्न असायचा. पण गरिबी दिसायची मला. आपल्याकडे पैसे नाहीत ही जाणीव मला झाली होती. शिक्षण घ्यायचं आणि मग आपल्याला नोकरी लागेल असं काही आपल्या बाबतीत होणार नाही हे मला सारखं वाटायचं. त्यामुळे आपल्याला स्वतः चेच काही तरी करावे लागेल. स्वतःच्या पायावरच उभं राहावं लागेल याची पूर्ण कल्पना होती. पण जे काही करायचं त्यात महाराजांसारखं वेगळेपण सिद्ध करणारं, दैदिप्यमान असावं हेच उद्दिष्ट डोक्यात होतं.
मी पाककलेच्या प्रांतात जेव्हा रुळू लागलो तेव्हा मला माझे वेगळेपण सिध्द करण्यासाठी मी माझ्या बाजूने प्रयत्न करतच होतो. पण माझे आई बाबा दोघेही कलाप्रांताशी जोडलेले असल्याने आपसूकच माझ्या कामातही त्याचा प्रभाव पडला. नकळत माझ्या कामात एक कलात्मक जाण आणि परिपूर्णता असल्यामुळे कामातलं वेगळेपण लोकांना प्रकर्षाने जाणवू लागलं. त्यामुळे एक उत्तम शेफ म्हणून मान्यता मिळायला लागली. ती सर्व आई बाबांची पुण्याई.
- विष्णू मनोहर त्यांच्या पाककलेच्या कार्यक्रमामुळे घराघरात पोहचले. अभिनयची सुप्त इच्छा ह्या निम्मिताने पूर्ण करण्याचा तुमचा प्रयत्न होता का?
- हो तसं म्हणता येईल. माझी अभिनयाची हौस ह्या निम्मिताने पूर्ण होते.
पाकशास्त्रात जम बसू लागल्यावर रोटरी क्लबने त्यांच्या काही महिलांना पाककला शिकवण्याची विचारणा केली. मी एक संधी म्हणून त्याचा स्वीकार केला. पण त्या कार्यक्रमानंतर मला हळूहळू लक्षात येऊ लागलं की आपल्याला छान बोलता येतं, बऱ्यापैकी शिकवता येत. आपल्याला अक्टर व्हायचं होतं आणि ते आपण नाही होऊ शकलो नाही याची मनात कुठेतरी खंत मनात होती. त्यातून पाककलेच्या कार्यक्रमाची (कुकरी शोची) ओढ निर्माण झाली. ह्या निम्मिताने का होईना आपल्याला प्रेक्षकांसमोर येता येईल आणि आपली पाककला लोकांपर्यंत पोहचवता येईल ह्या विचाराने मी कुकरी शो करू लागलो .
देशा-विदेशातील अनेक वाहिन्यांसाठी पाककलेचे कार्यक्रम / कुकरी शो केले. प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात पाककलेचे प्रदर्शन करण्याची मला संधी मिळाली. मी वारंवार त्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करत राहिलो.
पुढे जाऊन अभिनयाची अपूर्ण राहिलेलं स्वप्नं निर्माता / दिग्दर्शक बनून पूर्ण केलं.
मी लहान मुलांसाठी ‘बोरू दि वंडर कीड’ ह्या अॅनिमेशनपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. त्याच बरोबर ‘वन्समोर’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली.- शिवकालीन खाद्यसंस्कृती कडे कसे आकर्षित झालात?
- कामातून सवड काढून मी गड-किल्ले यांची सफर करायचो. तिथे गेल्यावर इतरांप्रमाणे माझ्याही डोक्यात अनेक प्रश्न यायचे. स्थापत्य शास्त्राचे उत्तमोत्तम नमुने असलेले हे गड किल्ले कसे बांधले गेले असतील? कोणी बांधले असतील? महाराजांची युध्दनीती कशी असेल? महाराजांचे अष्टप्रधानमंडळ? हा आणि अश्या अनेक गोष्टी माझा कुतूहलाचा विषय होता. मग त्या उत्सुकतेपोटी मी माझं शोधकार्य सुरु केलं. बऱ्याच वेगवेगळ्या पुस्तकांची पडताळणी केली. अनेक लोकांना भेटलो. मग या शोधकार्यात माझं लक्ष वेधलं गेलं ते शिवकालीन खाद्य संस्कृतीकडे. त्याकडे फारसे लक्ष दिलं गेलं नाही असं माझ्या लक्षात आलं. पण मी पाकशास्त्रातील असल्यामुळे आकर्षित झालो. आणि मी माझा मोर्चा द्या दिशेने वळवला. बाकी बरेच विषय आहेत, तू कशाला त्यात लक्ष घालतोस असाही काहींनी सल्ला दिला. पण मी जिद्द सोडली नाही .
छत्रपतीची निगडीत साहित्याचा पाठपुरावा करायला मी सुरुवात केली. संत रामदास स्वामी , संत वांग्मय, शिवछत्रपतींची पत्रे खंड १ आणि २, छत्रपती शिवाजी सेतु, माधवराव पगडी, शिवचरित्र प्रदीप, उद्योजक शिवाजी महाराज, श्रीमान योगी कादंबरी, मल्हारराव चिटणीस यांची बखर, बुध्भूशन ग्रंथ या आणि अश्या अनेक शिवसाहित्याची, संदर्भ ग्रंथांची उजळणी करायला सुरुवात केली.
शिवसाहित्याचे अभ्यासक पांडुरंग बाळकवडे आणि बाबासाहेब पुरंदरे याच्या सोबत चर्चा केली. ह्यातून शिवकालीन खाद्य संस्कृती आणि काही पाककृती माझ्या हाती लागल्या. माझी उत्कंठा वाढत गेली आणि मग मी अजून जास्त खोलात जायचा प्रयत्न केला.

- नेमकी शिवकालीन खाद्यसंस्कृती काय होती? कुठल्या प्रकारच्या पाककृती शिवकाळात आढळतात?
- बदामी / बदामाचा हलवा, डाळींबाची खीर, कुडयाची चटणी, कुडयाची भाजी, देवखीर, पुरणपोळी, नारळभात, ज्वारीची भाकरी, राजमा या आणि अनेक पदार्थ शिवकाळात आढळतात.
- तेलासाठी तीळाचा, शेंगदाण्याचा किंवा जवसाचा वापर केला जायचा.
जिजाऊंना जेव्हा डोहाळे लागले होते तेव्हा ‘भदकन पुरणपोळी’ म्हणजे भातापासून तयार केलेली पुरणपोळी देत असा उल्लेख आढळतो.
शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि हा आनंद व्यक्त करण्यासाठी हत्तीवरून साखर वाटण्यात आली असं आपल्याला सांगितलं जातं. पण साखर आपल्याकडे खूप उशिरा आली.
उसाचा रस घट्ट करून त्यापासून गुळाची ढेप तयार केली जायची आणि तो पदार्थ गोड वापरला जायचा.
थेव्हिनियो नावाच्या ब्रिटीश अधिकाऱ्याने शिवाजी महाराज दिवसातून फक्त एकाच वेळेस अन्न ग्रहण करायचे असा उल्लेख केलेला आहे. खिचडी आणि लोणी असा माफक आहार असायचा. आग्र्याच्या कैदेत असताना महाराज आहाराविषयी नेहमी सतर्क असायचे. शत्रूला कुठलीच संधी मिळू नये यासाठी ते फक्त सुका मेवा खायचे असा उल्लेख आढळतो.
मॉ जिजाऊ यांनी ‘राजमा’ हा उत्तरेकडून मागवला असा इतिहासात उल्लेख आहे. खाण्यास पौष्टिक आणि चांगले उत्पन्न देणारे पिक असल्यामुळे जिजामातेने राजमाच्या बियाण्यांचे वाटप शेतकऱ्यांना केले व त्याच्या पेरणीचा आग्रह धरला. पौष्टिक पिकासोबतच शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत झाली. राजमातेने हे धान्य उत्तरेतून आयात केल्याने त्याला ‘राजमा’ ह्या नावाने संबोधलं जाऊ लागलं असा उल्लेख आहे.
गुलमोहराच्या फुलांपासून तयार केलेला मुरांबा किंवा गुलमोहराच्या ताज्या फुलांपासून आणि पानांपासून भाजी केली जायची .
- कुठल्याही मोहिमे दरम्यान किंवा युद्धकाळात मावळ्यांच्या अन्न पाण्याचा प्रश्न कसा मार्गी लावला जायचा? त्याचे काही उल्लेख शिवसाहित्यात आढळतात का?
- लढाईच्या मोहिमा ह्या पाच ते सहा महिने आधीच विचारपूर्वक आखल्या जायच्या. कोणती मोहीम कधी होणार? कुठे होणार ? कशी होणार? त्यासाठी सैन्याच्या दाणापाण्याची व्यवस्था काय असेल? ह्या आणि अश्या अनेक गोष्टींचा सबंध टाळेबंद हिशोब असायचा.
लढाईला जाणाऱ्या सबंध मावळ्यांच्या अन्नाचा प्रश्न आधीच मार्गी लावला जाई. लढाईच्या आसपास असणाऱ्या गावांमध्ये धान्य आणि धान्याचं बी पोचवलं जायचं. त्या त्या गावातील शेतकरी ते धान्य पेरायचे. युद्धकाळात त्याच धान्यापासून भाकऱ्या केल्या जायच्या आणि त्याचा सैन्याला पुरवठा करण्याची जबाबदारी त्या गावकऱ्यांवर असायची. कदाचित तेव्हा पासूनच ‘लष्कराच्या भाकऱ्या भाजणे’ ही म्हण प्रचलित झाली असावी.
महाराजांनी सुरु केलेल्या ह्या परंपरेचा वापर आम्ही करोनाच्या महामारीत आमलात आणतोय. दररोज पाच हजार व्यक्तींना आम्ही अन्नपुरवठा करतो आहोत. एवढ्या मोठ्या संख्येने जेवणाची सोय करताना पोळ्या करणे हे आमच्यासाठी वेळेच्या दृष्टीने कठीण काम होते. त्यामुळे आम्ही काही कुटुंबांकडे / सोसायटीतील रहिवाश्यांकडे पोळ्यांची मदत मागितली. त्यांनी मदतीचा हात पुढे केला. आज पाच हजार डब्यांसाठी लागणाऱ्या पोळ्याचा प्रश्न ह्या विविध कुटुंबाच्या मार्फत पूर्ण होतोय. महाराजांचा एक मावळा म्हणून मला खूप समाधान आहे.
घोड्यांच्या खोगीरांमध्ये धान्य साठवण्याची व्यवस्था केलेली असायची. आणि घोडेस्वाराच्या पाठीवर असलेल्या सामनात पाण्याची व्यवस्था केली जायची. लढाईच्या काळात जमिनीवर उतरायला वेळ नसायचा. मागच्या घोडेस्वाराचे प्यायचे पाणी पुढच्या घोडेस्वाराच्या पाठीवर असायचे .
- पाकशास्त्रातील काही विशिष्ट गोष्टीविषयी तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल.
- त्या त्या प्रदेशातील हवामानावर आणि तेथील भौगोलिक परिस्थितीवर तेथील पिकसंस्कृती अवलंबून असते. त्यानुसार धान्य पिकवले जाते. पण तरीही वेगवेगळ्या प्रदेशातील पाककृतींमध्ये काही प्रमाणात साम्य आढळते.
उदाहरणार्थ सोलकढी. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीपासून ते थेट दक्षिणेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची सोलकढी आपल्याला पाहायला मिळेल. नारळाचे दुध आणि कोकम / आमसुलापासून बनणाऱ्या ह्या सोलकढीची चव किंवा त्याची बनवण्याची पद्धत प्रांतानुसार बदललेली आपल्याला लक्षात येईल.
सुरुवातीला रस्सा / ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी आलं-लसून याची गोळी बनवून ठेवायचे. मग पुढे त्याचं रुपांतर ‘वाटण’ ह्या प्रकारात झालं. उत्तर भारतात रस्सा / ग्रेव्ही साठी दुधी भोपळा, लाल भोपळा किंवा काकडी यांच्या गराचा/ मगजचा वापर व्हायचा. नागपूर भागात ज्वारीच्या पिठाचा वापर करून रस्सा ग्रेव्ही घट्ट करायचे तर औरंगाबाद,सोलापूर ह्या परिसरात शेंगदाण्याचा कूट वापरून घट्टपणा आणला जायचा. तर कोकणात नारळ, नारळाचे दुध आणि काजू यांचा वापर करून वापरून ग्रेव्ही/ रस्सा घट्ट करायचे. त्यामुळे प्रत्येकाची चव वेगळी, पाककृती वेगळी. प्रांतानुसार त्यात बदल दिसतो.
शिवाजी महाराजांचा जन्म जिथे झाला त्या जुन्नरला नवीन तांदळाची सुगी झाली की जुना तांदूळ वापरायला काढतात आणि ह्या वर्षी पिकवलेला तांदूळ पुढच्या वर्षासाठी साठवून ठेवला जातो. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तांदळाच्या पिठात उडीत डाळीचे सारण भरून करंजी प्रकारातील एक उकडलेला पदार्थ केला जातो. ‘तांदळाचे फरे’ नावाने हा पदार्थ प्रचलित आहे. चंद्रदर्शनाच्या वेळी ह्या तांदळाच्या फेऱ्याचा नैवेद्य दाखवून कोजागिरीच्या दुधासोबत त्याचं सेवन केलं जातं. तोच पदार्थ उत्तर प्रदेशात कोजागिरीच्या सणाला तळून केला जातो आणि चंद्रदर्शनाच्या वेळी त्याचा नैवैद्य दाखवला जातो. त्याला ‘चावल के फरे’ असं संबोधलं जातं. नीट विचार केला तर दोन्हीही भागात चंद्र, नैवैद्य आणि पदार्थासाठी वापरले जाणारे जिन्नस समान आहेत फक्त पाककृती वेगवेगळ्या.
विदर्भातील अशाच एका वेगळ्या नैवेद्याचा उल्लेख पुराणात सापडतो. शेतकऱ्याला नवीन धान्याचे उत्पन्न झाल्यानंतर त्या धान्याचा रोजचा वापर सुरु करण्या अगोदर देवाला नैवैद्य दाखवण्याची प्रथा आहे. पिकवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या धान्याला एकत्र करून त्याचं पीठ तयार केलं जातं. त्यानंतर त्या पिठाचा गोळा भिजवून त्याची चपाती लाटली जाते. आणि त्या चपातीच्या पाट्या / काप करून ते दुधात टाकून उकळल्या जातात आणि साखर घालून त्याची खीर बनवली जाते. ह्याला ‘देवखीर’ म्हणतात. ह्या देवखिरीचा नैवेद्द्य दाखवल्या नंतरच नवीन पिकवलेल्या धान्याचा वापर सुरु केला जातो. ‘देवखीर’ खाण्यास अत्यंत पौष्टिक. आणि हे असे पौष्टिक अन्न त्या त्या हंगामात खाल्लं जावं म्हणून त्याला सणवार, देव ,भक्ती यांची जोड देण्यात आली. थेट देव, भक्ती या सोबत त्या पदार्थाचा संबंध जोडला गेल्याने आपसूक ह्या पदार्थांचं एक स्थान निर्माण होतं. आणि तो पदार्थ प्रचलित होतो.
- वेगवेगळया प्रांतातीत असंख्य चविष्ट पाककृतींचा तुमचा भरपूर अभ्यास आहे. तुम्ही त्याविषयी विस्तृत लेखनही केलं आहे. तुमची नाळ महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेली आहे. महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृती विषयी सांगा.
- मसाल्याची वांगी, भरली वांगी, पातळ भाजी, झुणका, मेतकुट, पंचामृत, अळूचं फदफदं, साबुदाण्याची खिचडी, बटाटावडा, पुरणाची पोळी, मासवडी, पाटवडी हे पदार्थ आपल्या महाराष्ट्रातील. आपल्या इथे महाराष्ट्रात पुरणपोळी करताना पुरण हे चण्याच्या डाळी पासून करतात. पण गुजरात राज्यात पुरणासाठी तुरीच्या डाळीचा वापर केला जातो. उत्तर महाराष्ट्रात खापरावर पुरणपोळी बनवली जाते आणि ती आकाराने सुद्धा बरीच मोठी असते. दक्षिणेत जी पुरणपोळी केली जाते तिचा आकार महाराष्ट्राच्या तुलनेत खूप छोटा असतो. बऱ्याच प्रांतात पुरणपोळी बनवली जाते. पण त्या सर्वात महाराष्ट्रातली पुरणपोळी सर्वात जास्त प्रचलित आहे.
जिलेबी आपल्याकडील महत्वाच्या मिष्ठान्ना पैकी एक. पण जिलेबी हा मूळ भारतातील पदार्थ नाही. तो आपल्याकडे अफगाणिस्तानातून आलेला आहे. ‘श्रीखंड’ हा आपल्या कडे तयार झालेला पदार्थ आहे. त्याच प्रमाणे कोथिंबीर वडी, मासवडी, पुडाची वडी, पातोडी रस्सा भाजी, शेव भाजी, वांग्याचे भरीत हे अस्सल महाराष्ट्राच्या मातीतील खाद्य पदार्थ खाद्यपदार्थ आहेत.
- शिवकालीन खाद्य संस्कृतीवर आधारित एकपात्री प्रयोग आपण करता. ह्या संकल्पनेचा नेमका उगम कसा झाला?
- पाककलेचे कार्यक्रम / कुकरी शो करताना मला लक्षात आलं की कुकरी शो तर मोठ्या प्रमाणात आहेत.
आपण लोकांना वेगळं काहीतरी द्यायला हवं असं सारखं वाटत होतं. त्याच बरोबर माझं अभिनय करण्याची आवड होतीच.
शिव साहित्यात जिथे जिथे अन्नाचा उल्लेख आहे अशा शिव काळातील घटना, नोंदी मी एकत्र केल्या.
त्यातून ‘असे रांधले अन्न’ ह्या शीर्षकाखाली एकपात्री प्रयोग सादर केले.
हो,माझे जगणे एका संस्थानिका सारखे आहे म्हटले तरी हरकत नाही .मला जुन्या गड किल्ल्यांना भेट दिल्यावर ,माझा पाय तिथून निघत नाही . मला पारंपारिक गोष्टी आवडतात .
मी माझे घर अगदी पारंपारिक पद्धतीने बनवले आहे .
चुना ,गुळ,रेती ,गुग्गुळ,उडदाची डाळ ,गोंदाचे पाणी वापरून पारंपारिक पद्धतीने भिंती तयार केल्या आहेत ,
माझ्याकडे 140 वर्ष जुना पियानो आहे ,१०० वर्ष जुना नक्षी काम केलेला पाळणा आहे .जुने खांब आहेत ,घरातल्या खिडक्या ,दारं, माझ्या घरातला प्रत्येक कोपरा बोलका आहे .
ह्या सिरीजचा विचार करायला हरकत नाही पण तूर्तास माझ्या युट्यूब चॅनेल Masteer Recipes द्वारे मी नवीन पाककृती घेऊन तुमच्या भेटीला येत राहील .
Masteer Recipes चॅनेल