नमस्कार,
मी श्रीधर कुलकर्णी उर्फ गट्टू. मला लहानपणापासून नाटकाची आवड आहे. माझ्यासाठी नाटक कधीच इतर ऑक्टीव्हीटी नव्हती. माझ्यासाठी ती नेहमीच मेन ऑक्टीव्हीटी होती. आणि आपल्याला नाटकातच काहीतरी करायचं आहे हे पक्कं ठरलं होतं. म्हणून बी. कॉम. पूर्ण केल्यावर ललित कला केंद्र, सा. फु. पुणे विद्यापीठ इथून नाटकाचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

‘नाट्यकुल’ ची सुरुवात:
नाटकाचे पदव्युत्तर शिक्षण घेत असताना शेवटच्या वर्षी ‘उपयोजित रंगभूमी’ हा विषय अभ्यासला गेला आणि नाटकाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. नाटक समाजाच्या मनोरंजनासाठी असतच पण त्याशिवाय ते प्रबोधनासाठी, बदल घडवण्यासाठीही असतं. नाटकाची कलात्मक प्रकिया जर समाजात राबवली तर खूप चांगले बदल घडू शकतात. हे ‘उपयोजित रंगभूमी’ने शिकवलं. हाच विचार मनात ठेवून ‘गोष्टरंग’ या उपक्रमाच्या माध्यमातुन नऊ महिने पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील मुलांच्या लेखन व वाचन विकासासाठी नाटक आणि गोष्ट हे माध्यम वापरून काम केलं. हे काम करत असताना खूप वेगळा अनुभव, समाधान, आनंद व आत्मविश्वास मिळत होता. म्हणून तेच काम करत रहायचं अस ठरलं. आणि त्यातूनच ‘नाट्यकुल’ ही संस्था स्थापन केली.

नाट्यकुल म्हणजे काय?
-लहान मुले, शिक्षण व नाटक या तीन गोष्टींचा मेळ साधून काम करणारी संस्था.– नाटकाची प्रक्रिया मुलांसोबत राबवून मुलांचं व्यक्तिमत्त्व विकसित करणारी संस्था. गोष्टींचा गाव
लॉकडाऊन घोषित झालं आणि अचानक असं लक्षात आलं की आता आपलं काम थांबणार. कारण घराबाहेर पडता येणार नाही. मग घरात बसून काय करता येईल? असा विचार सुरू झाला. मग तंत्रज्ञानाचा पूरक वापर करायचं ठरलं. आणि रोज एका गोष्टीचा व्हिडियो करून मुलांपर्यंत पोहोचवायचं ठरलं. माझ्यातली एक कमतरता मला सतत जाणवते, ती म्हणजे ‘सातत्यता’. या उपक्रमाच्या माध्यमातून ही कमतरता भरून काढायचं ठरलं. घरात गोष्टीची पुस्तकं होतीच. ती सगळी वाचणं, गोष्टी निवडणं हे सुरू झालं. मग त्या मोबाईलवर शूट करणं , त्या एडीट करणं, अपलोड करणं हा रोजचा उद्योग होऊ लागला. पण त्यानिमित्ताने तंत्र शिकायला मिळालं. तंत्राची मजा यायला लागली. या सगळ्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे. आणि हे सगळं माझं मलाच आवडायला लागलं. प्रक्रियेची मजा यायला लागली. ती मजा येत आहे म्हणूनच ५० भाग पूर्ण झाले.

आव्हाने :
या प्रक्रियेच्या आनंदात कुठलीच गोष्ट अडथळा किंवा आव्हान वाटली नव्हती. पण आता घरात असलेला गोष्टींचा साठा संपत चालला आहे. त्यामुळे पुढचे भाग कसे करायचे हा प्रश्न आहे. पण त्यावरही उपाय निघेल. नाही निघाला तर मात्र जमतील तेवढे भाग करून थांबावं लागेल. त्याचीही तयारी आहे.
मुलांसाठीचे साहित्य:
असं वाटतं की मुलांवर संस्कार आणि उपदेश करणारं साहित्य मोठया प्रमाणात लिहिलं जातंय ज्यात मुलांना ‘संस्कारी’ बनवण्याचा सूर उगाचच काढलेला असतो.याऐवजी मुलांच्या भावविश्वातलं, मुलांना आनंद देणार साहित्य निर्माण होण्याची गरज आहे. आजच्या लहान पिढीची गरज ओळखून साहित्य निर्मिती करण्याची गरज आहे. असं वाटतं.
मोठ्यांसाठी लिहिल्या जाणाऱ्या साहित्याचे अनेक प्रकार आहेत. तसे बालसाहित्यातही असावेत. मोठ्यांसाठी लिहिणारे बरेच आहेत. तसेच लहानांसाठी लिहिण्याचाही प्रत्येक लेखकाने प्रयत्न करावा अस वाटत. अर्थात हे सगळं करत असताना एका वेगळ्याच जबाबदारीचे भान असावे लागेल.

माझ्यातील बदल:
जसा लहान मुलांसोबत काम करू लागलो आहे तसा मी जास्त तरल आणि संवेदनशील झालो आहे असं मला वाटत. माझ्यातील ऊर्जा योग्य प्रकारे वापरली जात असल्याच समाधान मला मिळत आहे. शिवाय माझ्यातील लहानपण जपता येत आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून ‘सातत्यता’ जपता आली याचे समाधान वाटते आहे. नाट्यकुलची youtube link : https://www.youtube.com/channel/UCl6Dq_5-U2460yFx2sKAozg नाट्यकुलची facebook link : https://www.facebook.com/Naatyakul-110383383653475/